जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी काश्मीरी लोकांनी १९४७ सालीच दोन राष्ट्रांची थेअरी पाण्यात फेकून दिली आहे. आम्हाला पाकिस्तानसोबत जायचं नाही हे त्यावेळीच काश्मीरी लोकांनी स्पष्ट केल्याचं विधान केलं आहे.
नॅशनल कॉन्फर्न्सचे अध्यक्ष असलेल्या अब्दुल्ला यांनी यापूर्वी आपण पाकिस्तानबरोबर संवाद साधावा अशी भूमिका घेत होतो. मात्र आता केंद्र सरकारने अशी कारवाई करावी की पुन्हा पहलगामसारखे हल्ले होता कामा नये, अशी उद्विग्न प्रतिक्रिया नोंदवली आहे. “पाकिस्तानबरोबर चर्चा व्हावी असं मी नेहमी म्हणायचो. मात्र आता अशी भूमिका घेतली तर ज्यांनी प्राण गमावले आहेत त्यांच्या प्रियजनांना काय उत्तर द्यायचं?” असा सवाल अब्दुल्ला यांनी उपस्थित केला आहे. “आपण लोकांना न्याय देत आहोत का? बालाकोटबद्दल नाही बोलत आहे मी. आज देशाची अशी इच्छा आहे की या हल्ल्याविरोधात इतकी कठोर कारवाई केली जावी ज्यामुळे हल्लेखोरांना कायमचा धडा मिळेल आणि असे हल्ले कायमचे बंद होतील,” अशी अपेक्षा अब्दुल्ला यांनी व्यक्त केली आहे.