काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर तुम्ही सरकारबरोबर आहात. सरकारबरोबर म्हणजे तुम्ही सरकारच्या चुकांबरोबर आहात का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक तसेच राज्यसभा खासदार शरद पवार यांना केला आहे. शरद पवारांनी पहलगाम हल्ल्यांसंदर्भात बोलताना सरकारला पूर्ण पाठिंबा जाहीर केल्यानंतर संजय राऊत यांनी थेट शरद पवारांवरच निशाणा साधला आहे.
“सरकारने ज्या चुका केल्या आहेत देशाच्या सुरक्षेसंदर्भात त्यावर कोणी बोलायचं?” असा सवाल राऊतांनी शरद पवारांना विचारला आहे. “शिवराज पाटील यांचा राजीनामा घेतला होता तेव्हा शरद पवार मंत्रिमंडळात होते. शिवराज पाटील यांनी बॉम्बस्फोट घडवले नव्हते ना पण त्यांची नैतिक जबाबदारी होती. म्हणूनच काँग्रेसने शिवराज पाटील यांचा राजीनामा घेतला होता. आम्ही सरकारच्या बरोबर आहोत असं कोण बोलत असेल तर बोलू द्या त्यांना,” असा टोला राऊतांनी लगावला. “आम्ही सरकारच्या बरोबर आहोत पण युद्ध तर सुरू करा सरकार राजकारण करत आहे या सगळ्या गोष्टींचे,” असंही राऊत म्हणाले.