मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू आहे. या मार्गावरील एकमेव भूमिगत स्थानक असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुल स्थानकाचे ७६ टक्के खोदकाम पूर्ण झाले असून या स्थानकाचा व्हिडिओ केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी बुलेट ट्रेनच्या मुंबई स्थानकाची पाहणी केली. आत्तापर्यंत १४.२ लाख घनमीटर मातीचे खोदकाम पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनचे काम महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सुरू आहे. ५०८ किमी लांबीचा हा बुलेट ट्रेन प्रकल्प आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम करीत आहे. महाराष्ट्र, गुजरात, दादरा आणि नगर हवेलीमध्ये बुलेट ट्रेनची कामे सुरू आहेत. या मार्गातील मुख्य आकर्षणाचा भाग म्हणजे २१ किमी लांबीचा वांद्रे – कुर्ला संकुल – शीळफाटा बोगदा. समुद्राखालून हा बोगदा आहे.
वांद्रे कुर्ला संकुल -शिळफाट्या दरम्यान २१ किमी लांबीच्या बोगद्यापैकी ठाणे खाडीतील ७ किमी लांबीचा देशातील पहिला समुद्राखालील बोगदा ठरणार आहे. बुलेट ट्रेनसाठी खोदण्यात येणारा बोगदा अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गासाठी एकच असणार आहे.