लोहमार्ग पोलिसांनी वाहतूक विभागाशी चर्चा केल्यानंतर पुणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये नवा नियम लागू केला आहे. पुणे रेल्वे स्थानक परिसर हा नो पार्किंग झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळेच आता पुणे रेल्वे स्थानक आवारातील अधिकृत वाहनतळ वगळता दोनशे मीटरच्या परिसरात कोणत्याही प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळे स्थानकाच्या आवारातील कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. मात्र त्याचवेळेस नागरिकांना काही प्रमाणात गैरसोयही सहन करावी लागणार असल्याची चर्चा आहे.
पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातील दोन्ही प्रवेशद्वारांवर (इन आणि आउट गेट) बेशिस्तपणे वाहने लावल्याने या भागातील वाहतूक विस्कळीत होत होती. प्रवेशद्वाराच्या परिसरात वाहने लावल्याने कोंडी होत असल्याच्या दिसून आलं होतं. रेल्वे स्थानकाच्या आवारातील कोंडीच्या पार्श्वभूमीवर लोहमार्ग पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांनी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्याशी उपाययोजनांबाबत चर्चा केली होती. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी रेल्वे स्थानकाच्या परिसरातील दोन्ही प्रवेशद्वारांपासून 200 मीटर अंतरावर सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्याचा निर्णय घेतला.