बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारने सहकलाकार परेश रावल यांच्याविरोधात २५ कोटींचा नुकसानभरपाईचा दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. परेश रावल यांनी ‘हेरा फेरी 3’ चित्रपट सोडल्याने चित्रीकरणात अडथळा निर्माण झाल्याचा आरोप आहे. परेश रावल यांनी एक्स पोस्टच्या माध्यमातून चित्रपटातून बाहेर पडत असल्याची पुष्टी केल्यानंतर दोन दिवसांनी अक्षय कुमारने हे पाऊल उचललं आहे.
१८ मे रोजी परेश रावल यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत, क्रिएटिव्ह मतेभद किंवा पैशांच्या मुद्द्यांवरुन चित्रपट सोडला नसल्याचं सांगितलं आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “हेरा फेरी 3 मधून बाहेर पडण्याचा माझा निर्णय क्रिएटिव्ह मतभेदांमुळे नव्हता हे मी सांगू इच्छितो. मी पुन्हा सांगतो की चित्रपट निर्मात्याशी कोणताही क्रिएटिव्ह मतभेद नाही. चित्रपट दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्याबद्दल मला अपार प्रेम, आदर आणि विश्वास आहे.”
या चित्रपटासाठी परेश रावल यांना त्यांच्या नेहमीच्या मानधनापेक्षा तिप्पट जास्त मानधन देण्यात आल्याची माहिती आहे. अक्षय, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांनी यावर्षी एप्रिलमध्ये चित्रपटाचं चित्रीकरण सुरू केलं होते. अक्षय ‘हेरा फेरी 3’ चा निर्माते देखील आहे. त्याने निर्माता फिरोज नाडियाडवाला यांच्याकडून कायदेशीररित्या हक्क खरेदी केले आहेत.
“परेश यांनी व्यावसायिक सचोटी किंवा व्यावसायिक नैतिकतेचा उघडपणे अवमान केला. जर त्यांना चित्रपट करायचा नव्हता, तर त्यांनी कायदेशीर करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी, स्वाक्षरीची रक्कम स्वीकारण्यापूर्वी आणि निर्मात्याला शूटिंगवर इतके पैसे खर्च करायला लावण्यापूर्वी तसे सांगितले पाहिजे होते,” असं या प्रकरणातील कायदेशीर कार्यवाहीची माहिती असलेल्या एका सूत्राने सांगितले आहे.