लग्न करू पाहणाऱ्या मुलींना अजित पवार आर्जव करत म्हणाले…

पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी अजित पवार यांच्या पक्षाशी हगवणे कुटुंबाचे असणारे संबंध पाहता विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली. ज्यानंतर त्यांच्या काही वक्तव्यांमुळंही अनेक चर्चांना उधाण आलं. याचसंदर्भात आता खुद्द अजित पवार यांनीच आपली बाजू माध्यमांसमोर मांडली आहे.

‘कस्पटेंच्या मुलीसोबत दु:खद घटना घडली त्याला माझा काय दोष? मला सांगा ना… अनेक माध्यमं दाखवतायत… पण त्यात माझा काय संबंध? मी तशा प्रकारे कृत्य करायला सांगितलं?’, असा सवाल त्यांनी केला. सदर प्रकरणातील तपासाविषयी माहिती देताना हगवणे कुटुंब कुठंही असतील तर त्यांना पकडण्याचे निर्देश देण्यात आले होते असं सांगताना तीन टीम त्यांना पकडण्यासाठी सज्ज ठेवण्यात आल्या असून, त्या दुप्पट करण्याच्याही सूचना आपण दिल्या होत्या असं त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं.

हगवणेंच्या आणखी एका सुनेकडूनही चौकशी करत नेमकं काय घडत होतं हे विचारण्याच्या सूचना पोलिसांना करण्यात आल्याचं सांगत आपण कस्पटेंच्या कुटुंबाला भेटणार असल्याचं पवारांनी सांगितलं. फोनवरून सर्वकाही बोलता आलं नसल्यानं प्रत्यक्षात भेटून कस्पटे कुटुबीयांशी या घटनेवर सविस्तर माहिती घेतली जाईल म्हणत, ‘मी किंवा मुख्यमंत्र्यांनी सक्त सूचना दिल्या असून अशा प्रकारच्या घटना घडल्याच नाही पाहिजेच यासाठीच यंत्रणा काम करत आहेत’, असा विश्वास त्यांनी दिला.

लग्न करु पाहणाऱ्या सर्वच मुलींना उद्देशून यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कळकळीची विनंतीसुद्धा केल्याचं पाहायला मिळालं. ‘माझं सगळ्या मुलींना आवाहन आहे. ज्या वधू म्हणून कोणत्या कुटुंबात जातात, त्यांना एकच सांगणं आहे की जरासाही त्यांना संशय आला आणि तक्रार केली तर ताबडतोब तिथं कारवाई करता येऊ शकते. अशानं इथपर्यंतची वेळ तुमच्यामाझ्या घरातल्या मुलींवर येणार नाही’, असंही ते आग्रही सुर आळवत म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here