गोंदिया जिल्ह्यातील आमगाव रेल्वे स्थानकावर पत्नीशी झालेल्या भांडणानंतर व्यवसायाने शिक्षक असलेल्या पतीने एक भयानक पाऊल उचलले. त्याने अचानक प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या छत्तीसगड एक्सप्रेसच्या इंजिनसमोर उडी मारली. ज्यामुळे तो ट्रेनला धडकला आणि त्याचा तात्काळ मृत्यू झाला. तुलसीदास पराते असे मृत इसमाचे नाव असून ते ३५ वर्षांचे होते. हे कुटुंब मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील होते.
तुलसीदास हे विदिशा येथे शिक्षक म्हणून काम करायचे. रविवारी ते आपली पत्नी आणि मुलीसह आमगावला लागून असलेल्या मध्य प्रदेश राज्यातील करंजा गावात चालले होते. तेथे ते एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी झाले. समारंभ संपल्यानंतर ते रविवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास घरी परतायला निघाले. पत्नी आणि मुलीसह आमगाव स्टेशनवर पोहोचले आणि पुढे जे झालं ते धक्कादायक होतं.
पराते कुटुंब छत्तीसगड एक्सप्रेसची वाट पाहत असताना पती-पत्नीत भांडण झाले. रागामुळे दोघांमधील तणाव वाढतच गेला. यामुळे संतापलेल्या पतीने एक भयानक पाऊल उचलले आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या छत्तीसगड एक्सप्रेस ट्रेनच्या इंजिनसमोर त्यांनी उडी मारून आत्महत्या केली.
तुलसीदास पराते यांनी ट्रेनखाली उडी मारली आणि मायलेकींनी एकच आक्रोश केला. या घटनेनंतर पत्नी आणि मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून लोकांची गर्दी जमली. रेल्वे ट्रॅकवर पडलेला मृतदेह दोन भागांमध्ये विभागला गेला होता. माहिती मिळताच आमगाव रेल्वे पोलीस घटनास्थळी पोहोचले. ही ट्रेन बिलासपूरहून गोंदिया मार्गे अमृतसरला जात होती. पराते कुटुंबाला याच ट्रेनने प्रवास करायचा होता पण नशिबात काहीतरी वेगळेच होते. घटनास्थळ पंचनाम्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी आमगाव रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे.