१० लाखांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ

प्रेमविवाह करूनही लग्नानंतर अवघ्या वर्षभरातच १० लाखांच्या हुंड्यासाठी सात महिन्याच्या गर्भवतीचा मानसिक छळ करून जीवे मारून टाकण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील वरणगे पाडळीमध्ये घडला आहे. संबंधित पीडित महिलेनं पतीविरोधात करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रोहीत अर्जुन दुधाणे (रा. मधली गल्ली, वरणगे पाडळी ता. करवीर) असं पतीचे नाव आहे. पीडितेने आपल्या तक्रारीत ऑक्टोबर २०२४ ते २ जून २०२५ पर्यंत पती रोहितने तुझ्या आई वडिलांनी मला लग्नात काहीच दिले नाही, त्यामुळे दहा लाख रुपये दे म्हणत मारहाण करुन माझा शाररीक, मानसिक छळ करत जीवे मारणेची धमकी दिल्याचं म्हटलं आहे.

पीडितेचं नर्सिंगचे शिक्षण घेत असताना रोहितशी ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर गेल्यावर्षी मे महिन्यात रोहित आणि पीडितेचा विवाह कोल्हापुरातील शुक्रवार पेठेत झाला. विवाहानंतर चार महिन्यांनी ऑक्टोबर २०२४ मध्ये गर्भवती राहिल्यानंतर रोहितने किरकोळ कारणांवरून पत्नीला त्रास देण्यास सुरुवात केली.

पत्नीने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, रोहित रोज कामावरुन आल्यानंतर मला बाळ नको असल्याचं सांगत गर्भपात करून मला घटस्फोट दे अशी मागणी करायचा. तसंच तुझ्या आई वडिलांनी लग्नात काहीच दिले नाही, मला आता १० लाख रुपये दे नाही, तर मला सोडून जा असं म्हणून त्रास देत होता. यानंतर २५ एप्रिल २०२५ मध्ये सातव्या महिन्यात रोहितने पत्नीला माहेरी आणून सोडले होते. त्यानंतर पत्नीने पतीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मोबाईल नंबर ब्लॉक केला होता. १७ मे रोजी पीडिताच्या मामांनी मध्यस्थी केल्यानंतर सासरी नांदण्यास गेली होती. घरातून लवकर जाण्यासंदर्भात विचारणा केली असता रोहितने पत्नीला शिवीगाळ करत “तू पहिल्यांदा गर्भपात कर, मग बोल, तू माझ्याकडे राहू नको, निघून जा” अशी धमकी दिली. संध्याकाळी उशिरा आल्यानंतर विचारणा केली असता तू मला काही विचारायचं नाही. पोटावर गुच्ची मारून ठार मारीन अशी रोहितने धमकी दिली.

विवाहित महिलेने आपला पती रोहित त्रास देत असल्याबाबत आई वडील आणि कोल्हापुरातील मामांना सांगितले होते. रोहितला पत्नीच्या नातेवाईकांनी समजावण्याचा प्रयत्न केला, पण रोहितने पिडीत महिलेच्या नातेवाईकांवर जीवघेणा हल्ला केला. यामध्ये पत्नीची मामी गंभीर जखमी झाली तर दोन मामा किरकोळ जखमी झाले. नातेवाईकांनी यासंदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातील इस्फूरली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी रोहितचा शोध घेऊन त्याला अटक देखील केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here