मुंबईत अत्यंत वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असणाऱ्या चर्चगेट रेल्वे स्थानकावर आग लागली आहे. प्राथमिक माहितीनुसार, स्थानकात प्रवेश करताना असणाऱ्या एका कँटीनला ही आग लागली आहे. प्रवाशांची कामावरुन घरी जाण्याची वेळ असल्याने स्थानकावर एकच गदारोळ सुरु आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
चर्चगेट स्थानकात प्रवेश करताना आतमध्ये कपडे, खेळणी तसंच खाद्यपदार्थांची अनेक दुकानं आहेत. यातील एका केकच्या दुकानाला ही आग लागली होती. आग मोठी असल्याने धुराचे लोट पसरले होते. अग्निशमन दलाचे जवान आगीची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं असून कुलिंगचे काम सुरु आहे. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून, ते शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे.