महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे आज 57 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंबाबरोबर बाहेर गेले असून ते आज कार्यकर्त्यांना भेटणार नाहीत. एकीकडे राज यांचा वाढदिवस असतानाच दुसरीकडे त्यांचे पुतणे आदित्य ठाकरेंचाही वाढदिवस आहे.
आदित्य ठाकरेंचा आज 35 वा वाढदिवस आहे. मागील काही आठवड्यांपासून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येणार अशी चर्चा असतानाच अनेक ठिकाणी या काका-पुतण्याला एकाच बॅनरच्या माध्यमातून बाजूबाजूला फोटो छापून मनसे आणि सेनेच्या कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्याचं दिसून येत आहे. मात्र या साऱ्या चर्चा आणि सेलिब्रेशनदरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये राज ठाकरेंना दिलेल्या शुभेच्छाही चर्चेचा विषय ठरत आहेत.
फडणवीस यांनी सकाळी पावणेअकरा वाजता राज ठाकरेंसाठी एक खास मेसेज आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे. फडणवीस यांनी केलेल्या पोस्टमध्ये राज ठाकरेंचा फोटो असलेलं खास शुभेच्छापत्र शेअर करण्यात आलं आहे. “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख श्री राज ठाकरेजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!” अशा शब्दांमध्ये राज यांना फडणवीसांनी शुभेच्छा दिल्या आहेत.