शालेय शैक्षणिक अभ्यास क्रमामध्ये हिंदी भाषेच्या समावेशासंदर्भातील दोन्ही शासन आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सायंकाळी मागे घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेना कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. हिंदीच्या सक्तीविरोधात दोन्ही पक्षांनी ५ जुलै रोजी मुंबईत विशाल मोर्चाची हाक दिली होती. मात्र त्यापूर्वीच शासनाने आदेश मागे घेतल्यानंतर आता दोन्ही पक्षांकडून विजयी जल्लोष साजरा केला जाणार आहे. हा कार्यक्रम वरळीमधील डोममध्ये पार पडणार आहे. एकीकडे यासंदर्भातील तयारी सुरु असतानाच दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्यातील १३ कोटी जनतेला एक संयुक्त पत्र लिहिलं आहे.
उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ‘जय महाराष्ट्र’ अशी दोन ओळीची कॅप्शन देत हे पत्र आपल्या अधिकृत एक्स (आधीचं ट्विटर) अकाऊंटवरुन शेअर केलं आहे. हे पत्र सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. ‘आवाज मराठीचा!’ या मथळ्याखाली ठाकरे बंधुंनी जारी केलेल्या या पत्रात काय म्हटलं आहे पाहूयात.
“मराठी मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, सरकारला नमवलं का? तर हो नमवलं…! कोणी नमवलं तर ते तुम्ही, मराठी जनांनी नमवलं! आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो,” असं या पत्रात म्हटलं आहे. तसेच पत्रात पुढे ठाकरे बंधुंनी, “त्यामुळे हा आनंद साजरा करतानासुद्धा, आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत, बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे,” असं म्हटलं आहे.