ज्येष्ठ क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी काळाच्या पडद्याआड! क्रिकेट समीक्षण लिहिणारा तारा निखळला!

लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
द्वारकानाथ संझगिरी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहे. या बातमीने संपूर्ण क्रिकेट विश्व हळहळलं. पेशाने सिव्हिल इंजिनीयर असलेले द्वारकानाथ संझगिरी मुंबई महापालिकेत उच्च पदावर काम करत होते. मात्र क्रिकेटच्या आवडीतून त्यांचातील क्रिकेट समीक्षक घडला. मराठी क्रिकेटरसिकांनी त्यांच्या लिखाणाला नेहमीच पसंतीची दाद दिली.

द्वारकानाथ संझगिरी यांनी एकाच वेळी दोन क्षेत्रांमध्ये काम केले. मुंबई महानगरपालिकेत अभियंता म्हणून नोकरी करताना २००८ मध्ये मुख्य अभियंता, पाणीपुरवठा प्रकल्प म्हणून सेवानिवृत्त झाले. त्याचबरोबर त्यांनी स्तंभलेखक, लेखक आणि सूत्रसंचालक म्हणूनही आपली एक वेगळी ओळख बनवली. द्वारकानाथ संझगिरी यांनी १९८३ पासून सर्वच वनडे क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धांचे वार्तांकन केले आहे. स्तंभलेखनाव्यतिरिक्त, संझगिरी यांनी प्रवास, सामाजिक समस्या, क्रीडा आणि चित्रपट अशा विविध विषयांवर ४० पुस्तके लिहिली आहेत.

हर्षा भोगले यांनी व्यक्त केलं दुःख

हर्षा भोगले यांनीही द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाची बातमी सांगत तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. ३८ वर्षांपासून माझा मित्र असणारा माणूस आज जग सोडून गेला आहे. त्याच्या लिखाणाचं स्मरण कायम राहिल. माझा मित्र द्वारकानाथ हा जे व्हिज्युअलाईज करायचा तेच त्याच्या लिखाणात उतरायचं. माझ्या मित्राच्या कुटुंबासह माझ्या सहवेदना. या आशयाची पोस्ट हर्षा भोगले यांनी लिहिली आहे.

बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आशिष शेलार यांनी लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, अतिशय दु:ख वाटलं, द्वारकानाथ संझगिरी हे क्रिकेटप्रेमी, क्रिकेटवर रिसर्च करणारे, क्रिकेटमधील खाचखळग्यांचं ज्ञान असलेले आमचे मित्र संझगिरी गेले याचं दु:ख झाले असं म्हटलं आहे.

बंदिस्त कार्यालयात न बसता प्रत्यक्ष मैदानावर जाऊन वार्तांकन करण्याचा त्यांचा पिंड होता. टीम इंडिया विदेशात खेळत असताना तिथे जाऊन सातत्याने वार्तांकन करणाऱ्या मोजक्या मराठी पत्रकारांमध्ये त्यांचा समावेश होतो. क्रिकेट विश्वातील शब्दसूर्य मावळला आणि ही पोकळी कधीच भरून न निघणारी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here