एका उद्योजकाने थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आपण मराठी शिकणार नाही, जे हवं ते करा असं आव्हानच दिलं आहे. सुशील केडिया यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, “राज ठाकरे याची नोंद घ्या की, मागील ३० वर्षांपासून मुंबईत राहत असूनही मला मराठी नीट येत नाही. आता तुमच्या अती गैरवर्तनामुळे मी निश्चित केलं आहे की, जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचे नाटक करण्याची परवानगी मिळत आहे तोपर्यंत मराठी शिकणार नाही अशी मी प्रतिज्ञा करतो. काय करायचं आहे बोल?”.
सुशील केडिया यांच्या पोस्टवर काहींनी कमेंट केल्या आहेत. यामधील एकाने म्हटलं आहे की, “मारहाणीला विरोध करता तर भाषेच्या अपमानालाही विरोध केला पाहिजे. मारहाण करणारे मनसैनिक जर राष्ट्रीय माध्यमांना दिसत असतील तर मराठीचा अपमान करणाऱ्या परप्रांतियांकडे डोळेझाक का?”. त्यावर त्यांनी उत्तर दिलं की, “मराठी भाषा न शिकणे हा त्यांचा अपमान नाही. पण मराठीच्या नावाखाली हलक्या दर्जाचे राजकारण आणि गुंडगिरी करणे हा त्यांचा अपमान आहे हे निश्चितच आहे”.