गाजावाजा करत राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. लाडक्या बहिणींचा करिश्मा निवडणुकीत पाहायला मिळाला. पण लाडक्या बहिणींची ओवाळणी देता देता नाकीनऊ आले आहे. कारण या योजनेमुळे अर्थसंकल्पीय तिजोरीवर भार वाढला आहे. यामुळे अनेक योजना बंद होण्याची शक्यता आहे. राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे, दोन लाख कोटींहून अधिक तूट आहे. त्यामुळे ही भरून काढण्यासाठी शिवभोजन थाळी आणि आनंदाचा शिधा यांसह इतर योजना बंद करण्याच्या विचारात राज्य सरकार असल्याचे म्हटले जात आहे.
लवकरच राज्याचे अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने विविध विभागनिहाय बैठका आयोजित करण्यात येत आहेत. त्या मध्ये इतर योजना बंद करण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या अनेक योजनांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे. एक लाख कोटी रुपयांची तूट भरुन काढण्यासाठी शिवभोजन थाळी व आनंदाचा शिधा या योजना बंद होण्याच्या मार्गावर आहेत.


शिवभोजन थाळी उद्धव ठाकरे यांचं सरकार असताना सुरु करण्यात आली होती. त्यावेळी छगन भुजबळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते. त्यामुळं एक लाख कोटींची तूट भरुन काढली तर गाडा सुरळीत चालू शकतो, असं अर्थमंत्र्यांचं म्हणणं आहे. शिवभोजन थाळीचे दिवसाचे लाभार्थी 1 लाख 90 हजार आहेत. या योजनेसाठी वार्षिक खर्च 263 कोटी रुपये लागतात.
आनंदाचा शिधा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरु करण्यात आली होती. दिवाळी, शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्यात येत आहे. आनंदाचा शिधा म्हणून चार वस्तू 100 रुपयात दिल्या जातात. बाजारात याची किंमत 500 रुपये इतकी आहे. त्यामुळं उरलेली रक्कम राज्य सरकार आपल्या अनुदानातून भरत होतं. आता या योजनांची चाचपणी सुरू आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेला केंद्रस्थानी ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे त्याचा फटका इतर योजनांना पडणार आहे.