‘पन्नास खोके एकदम ओक्के’ च्या घोषणा देत प्रताप सरनाईक यांना मागे पाठवलं

मीरा रोड-भाईंदरमध्ये मराठी एकीकरण समितीने हाक दिल्यानंतर मनसे आणि शिवसेना उबाठा पक्षाने या मोर्चास पाठिंबा देत सहभागही घेतला. मनसे आणि शिवसेना नेत्यांनीही या मोर्चाला पाठिंबा दिल्याने मोठा पोलीस बंदोबस्त मोर्चाच्या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. विशेष म्हणजे अविनाश जाधव यांच्यासह अनेक स्थानिक नेत्यांना पोलिसांनी स्थानबद्धही केले होते. त्यातच, शिवसेना नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक हे या मोर्चात सहभागी झाल्यानंतर मोर्चेकरांनी प्रताप सरनाईक यांना विरोध दर्शवला. 

माजीवाडाचे (मीरा-भाईंदरचे) लोकप्रतिनिधी आणि मंत्री प्रताप सरनाईक हेही मी आधी मराठी नंतर मंत्री असे म्हणत मोर्चात सहभागी झाले होते. मी मराठी लिहिलेली गांधी टोपी परिधान करुन ते मोर्चात आले. मात्र, प्रताप सरनाईक यांना पाहताच मोर्चेकरांनी जय गुजरात आणि 50 खोके एकदम ओक्के.. अशी घोषणाबाजी केली. दरम्यान, प्रताप सरनाईक यांचा एक जुना व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. मी जेव्हा मीरा भाईंदरच्या हद्दीत प्रवेश करतो, तेव्हा माझ्या तोंडून हिंदीच निघते, असे सरनाईक यांनी त्या व्हिडिओत म्हटल्याचे दिसून येते. त्यामुळे, मराठी एकीकरणासाठी निघालेल्या या मोर्चातील आंदोलकांनी प्रताप सरनाईक यांच्या सहभागाला थेट विरोध दर्शवला. त्यानंतर, प्रताप सरनाईक माघारी फिरले असून अधिवेशनासाठी मुंबईला गेले. विशेष म्हणजे मोर्चात सहभागी होण्यासाठी प्रताप सरनाईक हे मुंबईतील पावसाळी अधिवेशनातून मीरा भाईंदरमध्ये आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here