शिवसेना नेते संजय शिरसाट यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ते बनियानमध्ये बसले असून, समोर पैशांनी भरलेली बॅग दिसत आहे. मात्र संजय शिरसाट यांनी फक्त वर पैसे आणि आत कपडे होते असा दावा केला आहे. हा व्हिडीओ माझ्या बेडरुममधील असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली आहे. मी प्रवासातून आलो असल्याने बेडवर माझ्या कुत्र्यासह बसलो होतो. तसंच घरी असल्याने बनियानमध्ये होतो असा त्यांचा दावा आहे.
बेडरुममधील व्हिडीओ कोणी काढला यासंदर्भात विचारलं असता, त्यांनी एखाद्या उत्साही कार्यकर्त्याने काढला असावा असं म्हणत उद्धव ठाकरेंनाही टोमणा मारला. माझं घर म्हणजे मातोश्री २ नसून , माझ्या घरात सर्वांना प्रवेश मिळतो. एखाद्याने उत्साहासाठी व्हिडीओ काढला असेल. आमच्याकडे चिठ्ठ्या पाठवून प्रवेश दिला जात नाही. आपण कार्यकर्त्यांसाटी आहोत असं संजय शिरसाट म्हणाले आहेत.
दरम्यान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संजय शिरसाट यांचा व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे. “हा रोमांचक व्हिडिओ आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी पाहावा! देशात काय चालले आहे! (महाराष्ट्रातील एका मंत्र्याचा हा व्हिडिओ बरेच काही सांगून जातो),” असं त्यांनी व्हिडीओ पोस्ट करताना लिहिलं आहे.