कनार्क पुलाला ऑपरेशन सिंदूरचे नाव देणे म्हणजे राजकारण, उद्धव ठाकरे गटाची टीका

कर्नाक पुलाला छत्रपती प्रतापसिंह महाराजांचेच नाव देऊन इतिहासातील काळी खूण पुसायला हवी होती. नव्याने बांधलेल्या कर्नाक पुलास छत्रपती प्रतापसिंह महाराज किंवा मुधोजीराजे यांचे नाव देणे संयुक्तिक ठरले असते. कर्नाकवर सूड घेतला असेही झाले असते, पण फडणवीस यांनी पुलास ‘सिंदूर’ नाव देऊन पहलगामच्या हल्ल्याचे भावनिक राजकारण केले, अशी टीका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे.

“पहलगाम हल्ल्यातील चार दहशतवादी आरोपी अद्यापि जेरबंद होऊ शकले नाहीत, पण त्यानिमित्ताने जे ‘ऑपरेशन सिंदूर’ भारतीय लष्कराने केले त्याचे राजकारण करणे सत्ताधाऱ्यांनी अद्यापि थांबवलेले नाही. अशा राजकारणावरच मोदी व त्यांच्या पक्षाचे सत्ताकारण सदैव सुरू असते. जे मोदी करतात ते अर्थात फडणवीसही करणारच. दक्षिण मुंबईतील उड्डाणपुलाला तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर कर्नाकचे नाव देण्यात आले होते, परंतु इतिहासात नोंद असणारे दाखले पाहता, विशेषतः प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेल्या साताऱ्याच्या इतिहासात उल्लेख आहे की, गव्हर्नर कर्नाकच्या काळात छत्रपती प्रतापसिंह महाराज, मुधोजीराजे यांच्यावर अन्याय करण्यात आला. भारतीयांवर गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे लादण्यात आले. स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासातील अशा काळ्या खुणा पुसण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केली आहे. त्यामुळे कर्नाक उड्डाणपुलाचे नामांतर ‘सिंदूर’ असे करीत आहोत,’ असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले. गव्हर्नर कर्नाकने त्याच्या काळात सातारचे राजे छत्रपती प्रतापसिंह महाराज व नागपूरचे मुधोजीराजे यांच्यावर अन्याय केला. त्यांची राज्ये बरखास्त केली. प्रतापसिंह महाराजांचे वकील रंगो बापूजी हे लंडनला जाऊन सातारच्या गादीविरोधात झालेल्या अन्यायावर झगडत राहिले. प्रतापसिंह महाराजांनी ब्रिटिशांना तडकवून सांगितले होते की, ‘‘मी शरणागती पत्करणार नाही. ही छत्रपती शिवरायांची गादी आहे. कुणा दुकानदाराची गादी नाही. मी तुमच्या पुढे मान तुकवणार नाही.’’ अशा स्वाभिमानी राजावर कर्नाकने अन्याय केला अशी इतिहासात नोंद आहे. मग कर्नाक पुलाला छत्रपती प्रतापसिंह महाराजांचेच नाव देऊन इतिहासातील काळी खूण पुसायला हवी होती,” असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here