लोकांना बद्धकोष्ठतेबद्दल चर्चा करण्यास अनेकदा लाज वाटते. या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने गंभीर परिणाम होऊ शकतात, ज्यामध्ये आतड्यांचे नुकसान, मूळव्याध आणि हृदयाचा धोका वाढणे यांचा समावेश आहे.
आतड्यांचे आरोग्य आणि हृदयाचे आरोग्य यांचा जवळचा संबंध आहे. बद्धकोष्ठता ही अनेकदा किरकोळ पचन समस्या म्हणून नाकारली जाते, परंतु ती हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. आतड्यांवर सतत ताण आल्याने रक्तदाबात तात्पुरती पण धोकादायक वाढ होऊ शकते. हृदयरोगाचा वैद्यकिय इतिहास असलेल्या लोकांसाठी, यामुळे छातीत दुखणे, एरिथमिया किंवा क्वचित प्रसंगी हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. बद्धकोष्ठतेकडे कधीही दुर्लक्ष करू नये, विशेषतः वृद्ध व्यक्तींमध्ये किंवा हृदयरोग असलेल्यांमध्ये ही समस्या गंभीर रुप धारण करु शकते. शौचास ताण देण्याच्या कृतीमुळे छातीवरील दाब वाढतो आणि हृदयाला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो, ज्यामुळे हे चिंतेचे कारण ठरु शकते.
दररोज किमान २ ते ३ लिटर पाणी प्या, फळे, भाज्या आणि तृणधान्यांना रोजच्या आहारात समावेश करा. उच्च फायबरयुक्त पदार्थ खा आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय रहा. मल रोखून ठेवणे टाळा आणि वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर बद्धकोष्ठता एका आठवड्यापेक्षा जास्त काळ राहिली, विशेषतः छातीत दुखणे किंवा थकवा येत असेल, तर त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या, त्याकडे दुर्लक्ष करू नका.