अक्कलकोटमध्ये रविवारी सायंकाळी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून प्रतिक्रियांचा पाऊस पडत असतानाच कठोर शब्दांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. अशातच ज्या कारणासाठी हा हल्ला करण्यात आला ते फारस थिल्लर असल्याचंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावरुन हल्ला कोणत्या कारणासाठी केला या मुद्द्यावरुन टीका केली आहे. “प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा आरोपी दीपक काटे रेकॅार्डवरील गुन्हेगार आहे. भाजपाचा सक्रिय पदाधिकारी आहे. बावनकुळेंचा निकटवर्तीय आहे. या कामगिरीसाठी एखादी आमदारकी/ खासदारकी/ महामंडळ देऊनच टाका. भाजपच्या पात्रता चाचणी परीक्षेत पोरगा अव्वल नंबराने पास झालाय,” असा टोला अंधारेंनी लगावला आहे. “बाय द वे संभाजी ब्रिगेडमध्ये संभाजी हे नाव एकेरी आहे असं जर हल्ल्याचं कारण देत असाल तर भिडेंच्या नावातल्या संभाजीच काय करायचं?” असा सवाल अंधारेंनी केलाय.