संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक हल्ल्याप्रकरणातील आरोपी दीपक काटेसह त्याच्या एका साथीदारास अक्कलकोट न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. हा जामीन 20 हजारांच्या जात-मचुलक्यावर तसेच वेगवेगळ्या अटी व शर्तीवर मंजूर करण्यात आला आहे. प्रवीण गायकवाड यांच्यावर केलेल्या शाईफेक, वंगणफेक हल्ल्याप्रकरणी आरोपी दीपक काटेसह 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. रविवारी 13 जुलै रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास अक्कलकोट याठिकाणी प्रवीण गायकवाड यांना धक्काबुक्की करत शिवधर्म संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाईफेक केली होती.
आरोपींनी पुढे तपासासाठी सहकार्य करण्याच्या अटी व शर्तीवर अक्कलकोट तालुका प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एम.एम. कल्याणकर यांनी हा जामीन मंजूर केला आहे. तसेच, आठ दिवसाला अक्कलकोट किंवा सोलापूर या ठिकाणी पोलीस स्टेशनला दीपक काटे आणि भुवनेश्वर शिरगिरेला हजेरी लावावी लागणार आहे.