तलावांच्या ठेके वाटपात शिस्त महत्वाची – मंत्री नितेश राणे

राज्यातील गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढीसाठी या व्यवसायामध्ये पारदर्शकता आणि स्पर्धात्मकता महत्वाची आहे. त्या दृष्टीने राज्याचे मत्स्य धोरण तयार करण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. मंत्रालयात राज्यातील तलाव ठेक्यांची आढावा बैठक मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडली.

ग्रामीण भागातील अर्थकारणास चालना देणे आणि ग्रामीण जनतेचे उत्पन्न वाढवणे हा तलावांचे ठेके देण्याचा उद्देश आहे. तलावाच्या ठेके वाटपात शिस्त महत्वाची आहे, त्यादृष्टीने नितेश राणे यांनी सूचना दिल्या. या सर्व व्यवसायावर एक नियंत्रण हवे. त्यासाठी काही प्रमाणात शुल्क आकारण्यात यावे. राज्यात मत्स्य उत्पादन वाढीसाठी मोठी संधी आहे. मासेमारी हा राज्यातील एक मोठा व्यवसाय आहे. यासाठी तलाव ठेक्यांची संपूर्ण प्रक्रिया संगणकीय प्रणालीवर आणावी. या प्रणालीमध्ये सर्व माहिती उपलब्ध असावी. त्यामध्ये ठेका कोणत्या संस्थेला दिला, कधी दिला, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तलाव आहेत. याची सर्व माहिती असावी, अशा सूचना मंत्री राणे यांनी दिल्या.

दरम्यान मंत्री राणे यांनी रेडी बंदर विषयी आढावा घेतला. रेडी बंदर रेल्वे आणि चारपदरी महामार्ग याने जोडले जाणार आहे. त्यामुळे या बंदराच्या विकासास गती मिळणार असल्याचे मंत्री राणे म्हणाले. या बैठकीस महाराष्ट्र सागरी महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी प्रदीप, कॅप्टन प्रवीण खारा, संजय उगुलमुगले, महामंडळाचे प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये, फेमेंतो कंपनीचे कॅप्टन करकरे आणि उन्मेष चव्हाण उपस्थित होते.बैठकीस महाराष्ट्र मत्स्य व्यवसाय उद्योग विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक अनिता मेश्राम, मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांच्यासह मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here