मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत आरोप होत असलेल्या हनीट्रॅप संदर्भात उत्तर दिले होते. सध्या सभागृहात हनी ट्रॅपी प्रकरणाची चर्चा होतेय. पण ना हनी आहे ना ट्रॅप. नाना पटोलेंनी सभागृहात पेन ड्राईव्ह दाखवत बॉम्ब आणला होता असं समजतंय. पण नानाभाऊंचा बॉम्ब आमच्यापर्यंत आलाच नाही. ते गृहखात्यापर्यंत पोहोचवलंच नाहीय, असा टोला लगावतानाच कोणत्याही आजी-माजी मंत्र्याची हनी ट्रॅपची तक्रार नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी नाशिकच्या हनी ट्रॅपची सीडी आमच्याकडे असल्याचा दावा केलाय.
यावर विजय वडेट्टीवार यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले की, हनी ट्रॅपवरून ना हनी आहे ना ट्रॅप, असे मुख्यमंत्री म्हणाले. पण, त्या संदर्भात फार मोठी माहिती सरकारकडे देखील आहे आणि विरोधी पक्षाकडे देखील आहे. मागील काळात जी काही सत्तापालट झाली ती देखील अशाच सीडीमुळे झाली, इतकं मोठं ते प्रकरण आहे. त्यात खूप मोठी माणसं आहेत. त्यावर खूप काही बोलण्याची गरज नाही. ज्या वेळेस आम्ही ते दाखवू, त्यावेळेस आम्हाला दहा-वीस हजार रुपयांचे तिकीटच लावावे लागेल. ते तिकीट लावूनच आम्हाला चित्र दाखवावे लागेल. पण, त्यात निमंत्रित आणि विशिष्ट लोकांनाच बोलवावे लागेल एवढा मोठा भक्कम पुरावा त्यात आहे, असा दावा त्यांनी केला आहे.