हिंदी आणि मराठी भाषा, त्रिभाषा सूत्रावरून राज्यात वाद सुरु असतानाच आता त्यात खासदार निशिकांत दुबे यांनी त्यांच्या वक्तव्यानं राज ठाकरे आणि मराठी भाषिकांना पुन्हा एकदा डिवचलं आहे. इतक्यावरच न थांबता आता पुन्हा एकदा एका मुलाखतीदरम्यान दुबे यांनी थेट मुंबईचं महाराष्ट्रातील स्थान आणि गुजरातशी असणारं नातं यावर भाष्य करत अनेकांच्याच भुवया उंचावल्या.
‘हिंदी भाषेच्या नावावर जो डंका वाजवला जातोय. मराठी मराठी करताय, मी सांगतो मुंबई तर गुजरातचा भाग होती. मुंबई महाराष्ट्राचा भाग नव्हती. 1956 जेव्हा भाषेच्या आधारावर विभागणी झाली तेव्हा मुंबई महाराष्ट्राचा भाग झाली. खूप चांगली गोष्ट झाली ही. पण आजही मुंबईची स्थिती अशी आहे की फक्त 31 ते 32 टक्के मराठी भाषिक मुंबईत राहतात आणि तितकेच नागरिक हिंदी भाषिक आहेत. 2 टक्के भोजपुरी 12 टक्के गुजराती, 3 टक्के तेलुगु आणि 3 टक्के तमिळ, 2 टक्के राजस्थानी तसेच 1 ते 12 टक्के उर्दू भाषिक राहतात’, असं दुबे म्हणाले.