अभिनेता शाहरुख खान मागील काही दिवसांपासून त्याच्या आगामी ‘किंग’ या चित्रपटाचं चित्रीकरणात व्यस्त होता. मुंबईतील गोल्डन टोबॅको स्टुडिओमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असतानाच एका साहसी दृश्याच्या चित्रीकरणादरम्यान त्याला गंभीर दुखापत झाली. ही दुखापत मांसपेशींशी संबंधित असल्याच कारणानं अभिनेत्याला दीर्घकाळ आरामाचा सल्ला देण्यात आला आहे.
शाहरुख खान सध्या त्याच्या टीमसह उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाला आहे. तिथं डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्याला महिनाभर आराम करण्याचा सल्लाही दिला आहे. चित्रपटातील साहसदृश्य चित्रीत करताना यापूर्वीसुद्धा शाहरुखला मांसपेशींसंदर्भातील दुखापती झाल्या होत्या.
प्रकृती पूर्णपणे सुधारल्यानंतर शाहरुखच्या ‘किंग’ या चित्रपटाचं पुढील चित्रीकरण सुरू होईल अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. ज्यामुळं या चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण महिन्याभरासाठी थांबवण्यात आलं आहे.