नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा असल्याने भरघोस निधी नाशिकसाठी येणार आहे. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी महायुतीतील तीनही पक्षांमध्ये चढाओढ आहे. त्यातच आता गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना नाशिक पालकमंत्रीपदाचा निर्णय लवकरच होईल. मात्र, तो निर्णय काहीही असला तरी कुंभमेळ्याची जबाबदारी माझ्यावरच आहे, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता गिरीश महाजन यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 जानेवारीला पालकमंत्रीपदांची घोषणा केली होती. नाशिक जिल्ह्यासाठी भाजपचे गिरीश महाजन यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. मात्र या नियुक्तीला शिंदे गटाच्या नेत्यांनी विरोध केल्याने अवघ्या एक दिवसातच नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. आज सहा महिने होऊन देखील नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. नाशिकमधून कोण पालकमंत्री होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असता गिरीश महाजन यांनी हा मोठा दावा केला आहे.