अभिनेता रितेश देशमुखने आतापर्यंत मराठीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आता रितेश देशमुख पुन्हा एकदा राजा शिवाजी या चित्रपटातून भेटीला येणार आहे. या चित्रपटत रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारीही रितेश देशमुखने सांभाळली आहे. त्यानंतर आता रितेश छत्रपती शिवरायांचा इतिहास मोठ्या पडद्यावर पुन्हा जिवंत करणार आहे.
रितेश देशमुख सोबत या चित्रपटात अजून कोण झळकणार याबाबत उत्सुकता आहे. पण या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. अभिनेता अभिषेक बच्चन, संजय दत्त आणि फरदीन खान मुघलांची भूमिका साकारणार आहेत.

अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शक म्हणूण त्याचा हा दुसरा मराठी चित्रपट ‘राजा शिवाजी’ घेऊन येत आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. हा चित्रपट हिंदीमध्येही प्रदर्शित होणार आहे आणि विशेष म्हणजे रितेशने या चित्रपटासाठी अभिषेक बच्चन, संजय दत्त आणि फरदीन खान यांना साइन केलं आहे. ईटाइम्सच्या वृत्तानुसार, अभिषेक, फरदीन आणि संजय यांनी चित्रपटाची ऑफर स्वीकारली आहे.
रितेशने गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाची घोषणा करताना रितेशने लिहिलं होतं की, ‘इतिहासाच्या गर्भात एक असं व्यक्तिमत्व जन्माला आलं ज्याचं अस्तित्व नश्वरतेच्या पलीकडे होते. छत्रपती शिवाजी महाराज… हे केवळ एक ऐतिहासिक व्यक्ती नाहीत. ही ३५० वर्षांची भावना आहे, असाधारण शौर्याची ठिणगी आहे… प्रत्येकाच्या हृदयात उगवणारा आशेचा एक महान सूर्य आहे.’ आता येत्या शिवजयंतीला कोणती घोषणा करणार याकडे लक्ष आहे.