राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी चाकणमध्ये पहाणी दौऱ्यात एक मोठी घोषणा केली. पुणे शहराच्या आजूबाजूला असलेल्या परिसरामध्ये तीन महानगरपालिका केल्या जाणार असल्याचं अजित पवारांनी जाहीर केलं. अजित पवारांनी सकाळी चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्येबरोबरच नागरी समस्यांची पाहणी केली त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.
स्थानिकांशी चर्चा करताना, चाकणमध्ये नगरपरिषद असून यामुळे विकासावर मर्यादा येत आहेत. अशाच प्रकारची बंधनं हिंजवडीमधील औद्योगिक क्षेत्रातही येत आहेत. म्हणूनच चाकण आणि हिंजवडीला नवीन महापालिका तयार केल्या जाणार आहेत. या दोन शहरांबरोबरच उरळी देवाची-मांजरी-फुरसुंगसाठी नवीन महापालिका केली जाणार आहेत. चाकणसहीत या तीनही ठिकाणच्या महापालिका कोणाला आवडो न आवडो या सर्व महापालिका होणारच असा विश्वास अजित पवारांनी बोलून दाखवला आहे.