पुणे: गेली २३ वर्ष पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु सध्या पक्षात नव्यांना राम राम आणि निष्ठावंतांना थांब थांब असा नवा पायंडा पाडला जात आहे. या शब्दांत नाराजी व्यक्त करत पुण्यातील उपशहरप्रमुख राजेश पळसकर यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे.
उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या राजीनामा पत्रात राजेश पळसकर म्हणतात की, एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून समाजामध्ये काम करत असताना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन २००२ साली कॉलेज जीवनात भारतीय विद्यार्थी सेनेचा सदस्य होऊन शिवसेना परिवारात जोडलो गेलो. तेव्हापासून आजतागायत गेली २३ वर्ष पक्षाने दिलेल्या विविध जबाबदाऱ्या कोणत्याही अपेक्षा व लालसा न करता प्रामाणिक पार पाडत आलो. साम दाम दंड भेद या नीतीने संघटना वाढीसाठी काम करत राहिलो.
मागून आलेले अनेक जण पक्षाच्या माध्यमातून विविध संविधानिक पदावर गेले, तरीही कोणतीही तक्रार न करता पक्षासाठी झटत राहिलो असं त्यांनी सांगितले.तसेच हे करताना पक्षाच्या आंदोलनाचे अनेक गंभीर गुन्हे देखील माझ्यावर दाखल होऊन अनेकदा तुरुंगवारी झाली. आजपर्यंत पक्षावर आलेल्या संकट काळातही निष्ठावंत म्हणून पक्षासोबत राहिलो. परंतु अलीकडच्या काळात राजकीय महत्त्वाकांक्षा मनात ठेऊन काही जण पक्षाची पदे, उमेदवाऱ्या मिळवून कार्यभाग साधून निघून जात आहेत.
अशा पक्षाशी निष्ठा नसलेल्यांना मोठ्या पदावर घेण्याचा नवीन पायंडा काही नेत्यांकडून पाडला जात आहे असा आरोप त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर करत पळसकरांनी पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे.