सुपरस्टार रजनीकांत यांनी त्यांच्या अनोख्या स्टाईलमुळे चाहत्यांच्या मनात घर केले आहे. त्यांचे चाहते त्यांना देवासमान मानतात याच्या चर्चा सर्वांना माहितच आहेत. त्यांचे चाहते आजही त्यांचे जुने चित्रपटही आवडीनं पाहतात. अनेक कलाकारही रजनीकांत यांचे चाहते आहेत. त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळणं म्हणजे कोणत्याही कलाकारासाठी मोठी पर्वणीच. बॉलीवूड अभिनेत्री शीबा आकाशदीप हिनं सिनेविश्वात पाऊल ठेवल्यावर तिला पहिल्याच चित्रपटातून ही संधी मिळाली. आता शीबानं रजनीकांत यांची प्रसिद्धी आणि चाहत्यांचं त्यांच्यावरील प्रेम सांगताना काही किस्से सांगितले आहेत.
शीबा आकाशदीपनं नुकतेच रजनीकांत चाहते त्यांची एक झलक पाहण्यासाठी किती वेडे होतात हे सांगितलं आहे. ती म्हणाली “रजनीकांत यांची प्रसिद्धी इतकी जास्त आहे की, त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते अगदी पहाटेपासून रांगेत उभे राहायचे. रजनीकांत जर पहाटे ४ वाजता शूटिंगसाठी येणार असतील, तर तेव्हापासून हजारोंच्या संख्येने चाहते तेथे उपस्थित असायचे.”
शीबा पुढे म्हणाली, “मी शूटिंगच्या वेळी पाहिलं आहे, ते ज्या ठिकाणाहून चालत पुढे जायचे तेव्हा त्यांच्या पायांचा स्पर्श झालेली धूळ चाहते गोळा करायचे. ही धूळ चाहते एका प्रसादाच्या स्वरूपात आपल्याजवळ ठेवत होते. लोक मोठमोठे फुलांचे हार घेऊन यायचे आणि रजनीकांत यांना त्याने सजवायचे.”
शीबा आकाशदीप हिनं अनेक हिंदी मालिका आणि चित्रपटांतून भूमिका साकारल्या आहेत. तसेच तमीळ चित्रपटांतही तिनं काम केलं आहे. १९९० पासून तिनं आपल्या अभिनयाला सुरुवात केली. ‘अथिसया पिरवी’ हा तिचा पहिलाच चित्रपट होता ज्यात तिनं रजनीकांत यांच्यासोबत भूमिका केली. त्यानंतर तिनं ‘ये आग अब बुझेगी’, ‘बारीश’, ‘ज्वालामुखी’ अशा अनेक चित्रपटांतून काम केलं.