मुंबईची जीवनवाहिनी म्हणजे लोकल. रोज लाखो प्रवासी मुंबईत लोकलने प्रवास करतात. पण गेल्या काही वर्षांपासून लोकलने प्रवास करताना होणाऱ्या अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. अपघाताचे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. विविध उपाययोजना करूनही अपघातांच्या संख्येत घट झालेली नाही. याबाबतची एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
2023 मध्ये मुंबई उपनगरीय रेल्वेमध्ये 2 हजार 590 लोकांचा मृत्यू झाला होता. 2024 मध्ये हा आकडा थोडा कमी झाला. मात्र त्यानंतरही गेल्या वर्षभरात एकूण 2 हजार 468 प्रवाशांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. रेल्वे पोलिसांच्या (जीआरपी) आकडेवारीनुसार, मुंबई उपनगरीय रेल्वे विभागामध्ये मृतांची संख्या अजूनही खूप जास्त आहे. गेल्या दोन वर्षांत ठाणे, कल्याण, बोरिवली आणि वसई या स्थानकांवर रूळ ओलांडणे आणि गाड्यांमधून पडून सर्वाधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
रेल्वे ट्रॅक ओलांडताना झालेले अपघात हे मृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे. या आकडेवारीनुसार गर्दी, अपघात आणि इतर कारणांमुळे मुंबई लोकलध्ये दररोज सरासरी सहा ते सात मृत्यू होतात. गेल्या 20 वर्षांत 50 हजारहून अधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे या दोन्ही विभागांकडून दररोज एकूण 3 हजार 204 लोकल सेवा चालवल्या जात आहेत. यातून दररोज 75 लाख प्रवाशांची वाहतूक होते.

गेल्या दोन वर्षात सर्वाधिक मृत्यूची नोंद वसई आणि बोरिवली रेल्वे पोलिसांच्या अखत्यारीत येणाऱ्या स्थानकांवर झाली आहे. 2024 मध्ये पश्चिम रेल्वेवरील वसई रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ट्रेनमधून पडून सर्वाधिक 45 जणांचा मृत्यू झाला. 2024 मध्ये बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक 137 लोकांचा मृत्यू रुळ ओलांडल्यामुळे झाला. पश्चिम रेल्वेवर 1 हजार 394 उपनगरीय सेवा चालवल्या जातात ज्यातू दररोज 35 लाख प्रवाशांची वाहतूक होते.
2024 मध्ये कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पुन्हा सर्वाधिक 116 जणाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याचा हद्दीत 2024 मध्ये रेल्वे रुळ ओलांडल्यामुळे 151 जणांचा मृत्यू झाला. मध्य रेल्वेवर दररोज 1 हजार 810 उपनगरीय लोकल सेवा चालवल्या जातात ज्यातन 40 लाख प्रवाशांची वाहतूक होते.