मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, पुणे, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यासह राज्यभरातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत असल्याचे चित्र आहे. यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते ठाकरे गटावर टीका करत आहेत. आम्ही गुहावटीला गेलो, त्याच वेळेस उद्धव ठाकरेंचे भविष्य संपले. त्यांना संधी दिली होती, मात्र त्यांनी आपण निष्क्रिय आहोत, हेच महाराष्ट्राला दाखवून दिले. खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहे, हे राजन साळवी यांना समजले म्हणून त्यांनी शिवसेनेत प्रवेश करायचा निर्णय घेतला. येत्या सहा महिन्यात ठाकरे गटामध्ये कोणीच शिल्लक राहणार नाही. टप्प्याटप्प्याने सगळेच खऱ्या शिवसेनेत प्रवेश करतील. उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्या नादाला लागल्यामुळे भविष्यात ते एकाकी पडतील, असे शहाजीबापू पाटील म्हणाले होते. यानंतर आता शहाजीबापू पाटील यांनी नवीन दावा केला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले की, चौकशी लावली म्हणून कोणी पक्षात येत नाही आणि कुणी पक्ष सोडून जात नाही. छगन भुजबळ यांची चौकशी सुरू आहे, त्यांनी पक्ष सोडला का, संजय राऊतांवर चौकशी सुरू आहे, त्यांनी पक्ष सोडला का, अशी विचारणा करत, अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची वास्तविक परिस्थिती अशी झाली आहे की, तिथे थांबण्यात काही अर्थ नाही, अशी अनेकांची भावना झाली आहे आणि ही भावना इथपर्यंत झाली आहे की, एक दिवस असा येईल की, आदित्य ठाकरेच वडील उद्धव ठाकरे यांना सोडण्याची भाषा करतील, या शब्दांत शहाजीबापू पाटील यांनी खोचक टीका केली.