नेमेचि येतो पावसाळा अगदी तसंच दरवर्षी वाजतगाजत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केलं जातं.. मराठी साहित्य संमेलन आणि वाद हे एक समीकरणच आहे. दरवर्षी साहित्य संमेलन हे वादामुळे लक्षात राहत. तिथे काय साहित्यिक चर्चा झाली. साहित्याच्या दृष्टीने काही चर्चा हे खूप लांब राहिलं. काही वर्षांपासून याला साहित्य संमेलन कमी आणि राजकीय संमेलन अधिक म्हणावं लागेल. उदगीर येथे झालेल्या संमेलनात उद्घाटनाला सुमारे पाऊण डझन नेते मंडळी व्यासपीठावर होती. त्यातील प्रत्येकाने तीच तीच भाषणं केली. नाशिक संमेलन एकाच व्यक्ती भोवती फिरत होतं.
यंदाच 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत आयोजित केलं होतं. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुढाकाराने आयोजित केलेले हे संमेलन साहित्याच्या चर्चेपेक्षा भलत्याच कारणांनी गाजल आणि वाजलं. साहित्य संमेलनाच्या तंबूत साहित्यिकांची मांदियाळी हवी ना पण आता या तंबूत राजसत्तेचा उंट शिरला आहे. त्यामुळे वेळ मिळाला तर साहित्यिक चर्चा होतात नाहीतर राजकीय चर्चा, टोमणे, जे रोज आपण टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये पाहतो तेच इथे पहायला मिळतं. यंदा तर या साहित्य संमेलनाने बऱ्याच चर्चा आणि ब्रेकिंग न्यूज दिल्या.

एक काळ होता जेव्हा आचार्य अत्रे, पु.ल.देशपांडे, पु.भा.भावे, गो.नी.दांडेकर, व.पु.काळे, ना.सी.फडके, नारायण सुर्वे, दुर्गा भागवत, इंदिरा संत या आणि अशा अनेक दिग्गज साहित्यिकांना वाचकांचे प्रेम मिळाल. किती लेखक किंवा कवी असे आहेत, जे एखाद्या कार्यक्रमात येणार आहेत, असे म्हटल्यावर सभागृह खच्चून भरत? एखादी व्यक्ती लेखक आहे हेच अनेकांना माहित नसतं. गेल्या काही वर्षांपासून राजकीय आशीर्वादाने ही साहित्य संमेलन होतात. शाही थाट असतो.. राजकीय नेते पैसे देतात म्हंटल्यावर त्यांची ऊठबस असणारच. मग अर्धवेळ तर हे राजकीय नेतेच व्यासपीठावर दिसतात. त्यांचीच चर्चा मग उरल्या सुरल्या वेळेत साहित्यिक, कवी लेखक यांना व्यासपीठावर मान दिला जातो. त्यामुळे ही संमेलने साहित्यप्रेमींची चळवळ न बनता, राजकीय चिखलफेकीचा अड्डा, तमाशाचा फड बनला आहे. तेच तेच नेते जर साहित्य संमेलनात येणार असतील तर सामान्य माणूस कशाला इकडे फिरकेल. या संमेलनात साहित्य कुठे आहे असा प्रश्न पडतो.
संमेलनाचे अध्यक्ष कायम वादात सापडतात.. मग ते फ्रान्सिस दिब्रिटो असो, श्रीपाल सबनीस असो, किंवा डॉ.तारा भवाळकर. दिब्रिटोंची चर्चा त्यांच्या साहित्यापेक्षा धर्मांतरासाठी जास्त होती. सध्या चर्चेत असलेल्या समेंलनाच्या अध्यक्षा डॉ.तारा भवाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका विधानावरून त्यांना लक्ष्य केले. ‘माझा जन्म जैविक नाही, म्हणणाऱ्यांवर तुम्ही किती विश्वास ठेवाल?’ असा सवाल भवाळकरांनी केला.

लगेच मिडिया ला ब्रेकिंग न्यूज मिळते. अमुक अमुक यांनी व्यासपीठावरून यांना खडे बोल सुनावले.
पंतप्रधान मोदींना तुम्ही पाहुणे म्हणून आग्रहाने बोलावले तर त्यांचा आदर राखायला पाहिजे.. आपल्या संस्कृतीत पाहुण्यांचा मान राखला जातो त्याचा अनादर करण्याची आपली पद्धत नाही.
साहित्य संमेलन म्हंटल की सारस्वतांची मांदियाळी, माय मराठी, माझ्या मराठीची बोलू कौतुके, दिल्लीत साहित्य संमेलन म्हंटल्यावर दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे तर यायलाच पाहिजे.. असे शब्द प्रयोग करायचे की झालं. तुम्ही साहित्यप्रेमी.
दिल्लीच्या साहित्य संमेलनात मराठीचा अमराठी संसार, आम्ही असे घडलो, राजकारणाचे साहित्यातले प्रतिबिंब, नाते दिल्लीशी मराठीचे असे चर्चा सत्रांचे विषय होते. आता याचा साहित्याशी काय संबंध हे कळत नाहीये. आणि यातल्या असे घडलो आम्ही या चर्चासत्रात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या एका विधानावरून जोरदार राजकीय राडा सुरू झालेला आहे. उबाठा सेनेमध्ये दोन मर्सिडीज दिल्या की पद मिळते, असा दावा गोऱ्हे यांनी या परिसंवादात केला. गोऱ्हेंचे आरोप खरे खोटे, हा इथे मुद्दाच नाही. पण या एका मुद्द्याने राजकीय वातावरण आता तापलं आहे.. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. मुद्दा हा आहे की साहित्य संमेलनाचा मंच हा काही उखाळ्या पाखाळ्या काढण्याचा मंच नाही. की राजकीय आखाडा सुद्धा नाही. फक्त नीलम गोरहेच नाही. तर खुद्द संमेलनाच्या अध्यक्षांना जर ज्यांना आग्रहाचं निमंत्रण देऊन बोलावलं त्या पंतप्रधान मोदींना टोमणा मारण्याचा मोह होत असेल तर काय म्हणावं.
थोडक्यात काय वेळ मिळालाच तर साहित्यावर चर्चा करायची नाहीतर भपकेबाज पण दाखवून राजकीय नेत्यांचा पैसा वापरून मस्त शाही मेजवान्या करायच्या एकमेकांवर चिखलफेक करायची याच साठी ही संमेलन आयोजित केली जातात.
साहित्य पंढरी अनुभवायची असेल तर राज सत्तेचे ऊंट बाजूला ठेवून लाखो वारकरी स्वखर्चाने, निरपेक्ष भावनेने जसे पंढरीच्या वारीला जातात तसे साहित्यिकांनी मनावर घ्यायला हवं. राजकीय लोकांनी पण कमीपणा न मानता हा तुमचा उखळ्या पाखाळ्या काढण्याचा मंच नाही हे लक्षात घेऊन केवळ लोकप्रतिनिधी म्हणून मदत करण्याची भूमिका घ्यायला पाहिजे.
भपकेबाजपण, शाही मेजवान्या नका ठेवू पण दर्जेदार साहित्यिक मेजवानी तर द्या. दोन वर्षांनी 100 व साहित्य संमेलन आहे. निखळ साहित्यकेंद्रित साहित्य संमेलन कधी भरेल अशी अपेक्षा मराठी साहित्य प्रेमी करत आहेत. निदान या पुढच्या संमेलनापासून तरी ही परंपरा सुरू करूया.