महाकुंभमेळ्यात विरोधकांनीही सहभाग घेतला. अगदी रोहित पवारांपासून अनेक नेते प्रयागराजला जाऊन गंगास्नान करून आले. परंतु, उद्धव ठाकरे महाकुंभमेळ्यात गेले नाहीत, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ज्याचा सनातन धर्मावर विश्वास आहे, ज्याला हिंदू जीवन पद्धती प्रिय आहे, असे सगळे लोक महाकुंभमेळ्यात गेले. काही लोक नाही, गेले त्याची वेगळी कारणे असू शकतात. कुणी गेले नाही म्हणजे त्यांचे सनातन धर्मावर प्रेम नाही, असे मी म्हणणार नाही. त्यांची आपली काही कारणे असतील. जे गेले त्यांचे प्रेम आहे, असे समजूया. केवळ दाखवण्यासाठी गेले नाही, असेही आपण समजूया, अशी संयमित प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
आत्मपरीक्षण करा आणि आधी आरसा पाहिला पाहिजे उद्धव ठाकरे अशा गोष्टी बोलत असतात. उद्धव ठाकरे काय बोलतात, त्याला रोज उत्तरे द्यायला माझ्याकडे तेवढा वेळ नाही. उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा आत्मपरीक्षण केले पाहिजे. समजा तेच खरे होते आणि हे जर गद्दार होते, तर महाराष्ट्रातील जनतेने गद्दारांना मतदान केले का? हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे. महाराष्ट्रातील जनतेने ज्यांना निवडून दिले आणि शिवसेना म्हणून ज्यांच्यावर शिक्कामोर्तब केले, त्याला तुम्ही गद्दार म्हणत आहात. तुम्ही आधी आरसा पाहिला पाहिजे, असे माझे मत आहे, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.