चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत गेल्या आठवड्यात भारत विरुद्ध पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील सामन्यात भारताने पाकिस्तानवर सहा गडी राखून विजय मिळवला. या सामन्यापासून पाकिस्तानचा फिरकीपटू अबरार अहमद चर्चेत आहे. एका बाजूला मैदानातील वर्तनामुळे त्याच्यावर टीका चालू आहे तर दुसऱ्या बाजूला त्याच्या उत्तम गोलंदाजीमुळे त्याचं कौतुकही होत आहे. शतकवीर विराट कोहलीने देखील अबरारच्या कोट्यातील १० षटकं पूर्ण झाल्यावर त्याच्याशी हस्तांदोलन केलं होतं, त्याच्या उत्तम गोलंदाजीसाठी त्याची पाठ थोपटली होती. त्यामुळे विराटवर त्याच्या खिलाडूवृत्तीबद्दल कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, मैदानात भुवई उंचावून शुभमन गिलला डोळे दाखवणारा, त्याला पॅव्हेलियनची वाट दाखवणाऱ्या अबरारचा आता सूर बदलला आहे. त्याने समाजमाध्यमांवर एक पोस्ट करून मवाळ भूमिका घेतली आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात अबरारने शुभमन गिलला बाद केलं होतं. त्यानंतर त्याने आपली एक भुवई तिरकसपणे उंचावून शुबमन गिलला पॅव्हेलियनमध्ये परतण्याचा इशारा केला. मैदानात त्याने केलेली ही कृती कॅमेरात कैद झाली. यानंतर अबरारला समाजमाध्यमांवर ट्रोल झाला. दरम्यान, आता अबरारचा सूर मवाळ झाला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीच्या फोटोसह एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच विराट हा त्याचा लहानपणापासूनचा हिरो असल्याचं त्याने म्हटलं आहे.
अबरारने समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये काय म्हटलंय?
अबरारने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की “माझा लहानपणापासूनचा हिरो असलेल्या विराट कोहलीसमोर गोलंदाजी करणं आणि त्याच्याकडून माझं कौतुक होणं हे माझ्यासाठी खूपच रोमांचकारी आहे. तो एक क्रिकेटपटू म्हणून जितका मोठा आहे तितकंच त्याचं मन मोठं आहे. तो मैदानावर असो अथवा मैदानाबाहेर तो सर्वांसाठी एक मोठा प्रेरणास्त्रोत आहे”.