HSRP नंबरप्लेट म्हणजे काय? ही नंबरप्लेट लावण्याकडे दुर्लक्ष करू नका नाहीतर…

तुमच्याकडे टू व्हीलर किंवा फोर व्हीलर कोणतंही वाहन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. परिवहन विभागाने प्रत्येक वाहनाला आता हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट अनिवार्य केली. सुरुवातीला 31 मार्च ही शेवटची तारीख होती. पण आता ती एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली. 2019 पूर्वीच्या सर्व दुचाकी आणि चारचाकी वाहनांना ही नंबर प्लेट बंधनकारक आहे.

HSRP नंबरप्लेट म्हणजे काय?

High Security Registration Plate ही अ‍ॅल्युमिनियमपासून बनवलेली नंबर प्लेट आहे जी गाडीच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला लावली जाते. HSRP वरच्या डाव्या कोपऱ्यात ब्ल्यू क्रोमियम-आधारित अशोक चक्र होलोग्राम आहे. त्याच्या डाव्या कोपऱ्यात एक यूनिक लेसर-ब्रँडेड 10-अंकी स्थायी ओळख क्रमांक (पिन) दिलेला आहे. याशिवाय, रजिस्ट्रेशन क्रमांकाच्या अंकांवर आणि अक्षरांवर एक हॉट-स्टॅम्प फिल्म लावली जाते आणि त्यासोबत ब्ल्यू कलरमध्ये ‘IND’ लिहिले जाते. विशेष म्हणजे वाहनाच्या डिजिटल रजिस्ट्रेशननंतर HSRP जारी केले जाते. अशाप्रकारे, या प्लेट्स वेगळ्या कारवर वापरता येत नाहीत.

HSRP प्लेट महत्त्वाची का?

एप्रिल 2019 पूर्वी उपलब्ध असलेल्या नंबर प्लेट्समध्ये अनेक गैरवापर होत होते, या नंबर प्लेट सहजपणे काढता आणि बदलता येत होत्या. त्यामुळे वाहन चोरीच्या घटनांमध्येही लक्षणीय वाढ झाली. अनेकदा असे दिसून आले की, वाहन चोरी केल्यानंतर, चोर हा रजिस्ट्रेशन क्रमांक बदलत असत, ज्यामुळे अधिकाऱ्यांना वाहनाचा शोध काढणे जवळजवळ अशक्य होते. एचएसआरपी नंबर प्लेट्स लागू झाल्यानंतर, कार चोरीच्या घटना कमी झाल्या आहेत कारण त्या फक्त एकदाच वापरता येतात. म्हणून यासाठी HSRP नंबर प्लेट लावणे हे अनिवार्य झाले आहे.

दुसरीकडे, HSRP मुळे वाहतूक पोलिसांचे कामही खूप सोपे झाले आहे. ही नंबर प्लेट लागू झाल्यानंतर, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांना पकडणे आणि त्यांच्याविरुद्ध चलन काढणे खूप सोपे झाले आहे. HSRP सह, रजिस्ट्रेशन प्लेट्स एकच फॉन्ट आणि स्टाईलमध्ये आहे, ज्यामुळे ही नंबर प्लेट पटकन ओळखून येते.

हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी प्रोसेस काय?

हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी तुम्हाला www.transport.maharashtra.gov.in ही अधिकृत वेबसाईट ओपन करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तेथील डिटेल्स अर्थात वाहनाचा क्रमांक, वाहनाच्या चेसीचा क्रमांक, पत्ता वैगेरे अशी माहिती भरावी लागेल. तसेच तुम्ही तुमचा अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला पेमेंट करावे लागेल आणि त्यानंतर तुम्हाला त्याची पावती देखील डाऊनलोड करता येईल. ही प्रोसेस केल्यानंतर पुढील काही दिवसांत तुमची हाय सिक्युरिटी नंबर प्लेट मिळेल.

नंबरप्लेट बसवली नाही तर काय होणार?

वाहनधारक आणि नागरिकांनी त्यांच्या वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट न बसविल्यास वाहनाचे मालकी हस्तांतरण, पत्ता बदल, वित्त बोजा उतरविणे/ चढविणे, दुय्यम आरसी/ विमा अद्ययावत करणे इत्यादी कामकाज थांबविण्यात येणार आहे. ही नंबर प्लेट नसलेली वाहने, बनावट एचएसआरपी नंबर प्लेट असलेली वाहने आदी वाहनांवर सबंधित कार्यालयाकडून भविष्यात दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here