अभिजीत सावंतनं अलीकडेच एका मुलाखतीत खुलासा केला की काही वर्षांपूर्वी तो ऑनलाइन डेटिंग प्लॅटफॉर्म ‘टिंडर’वर होता. त्यानं सांगितलं की लग्नानंतर काही वर्षांनी त्यानं टिंडर वापरायला सुरुवात केली होती. पण जेव्हा लोकांना हे समजलं की तो टिंडरवर आहे, तेव्हा त्यानं हे अॅप वापरणं बंद केलं. विशेष म्हणजे त्याची पत्नी शिल्पा सावंतला याबद्दल काहीच माहिती नव्हतं.
या मुलाखतीत त्यानं सांगितलं की त्यानं टिंडरवर दोन-तीन महिलांशी गप्पा मारल्या होत्या. त्याविषयी सांगत तो म्हणाला, ‘माझा स्वभाव जरा काहीतरी नवीन ट्राय करून पाहण्याचा आहे. एकदा मी माझ्या मित्रासोबत अमेरिकेत होतो, तेव्हा त्यानं सांगितलं की हे एक नवं अॅप आहे डेटिंगसाठी. मग मी तिथे प्रोफाईल तयार केलं. कधी कधी बघायचो काय आहे हे अॅप, काय चालतंय. मी माझंच नाव टाकलं होतं. काही खोटं नव्हतं. पण बायकोला काहीच माहीत नव्हतं. असं असलं तरी मी कुणालाच प्रत्यक्षात भेटलो नाही, काही खास झालं नाही.’
मला गप्पा मारायला खूप आवडतं हे सांगत अभिजीत म्हणाला, ‘टिंडरवर काही मुलींशी खूप छान गप्पा झाल्या. दोन-तीन मुली भेटल्या ज्या छान बोलायच्या. नंतर वाटलं की ट्विटरवर माझं अकाउंट आहे आणि लोकांना हे माहिती झालं तर कदाचित चांगलं वाटणार नाही. म्हणून मग बंद केलं.’