मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नाही अशी वारंवार तक्रार केली जाते. चित्रपटगृह न मिळाल्यामुळे मराठी चित्रपट चालत नसल्याचेही सांगितले जाते. आता यावर मराठीतील प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र जोशी यांनी मोठे विधान केले आहे. मराठी चित्रपट न चालण्यासाठी प्रेक्षकच अधिक जबाबदार आहेत. महाराष्ट्रातील प्रेक्षक मराठी कलाकारांवर भरभरून प्रेम करतात. मात्र मराठी चित्रपट चित्रपटगृहांमध्ये जाऊन बघण्याऐवजी घरीच टीव्हीवर किंवा मोबाईलवर बघतात, अशी खंत अभिनेते जितेंद्र जोशी यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, पुणे फिल्म फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मेराकी परफॉर्मिंग आर्टस ऑर्गनायझेनशच्या सहकार्याने आयोजित २३ वा पुणे ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’च्या नागपूर पर्वाचा समारोप रविवारी झाला. मेडिकल चौकातील व्हीआर मॉलमध्ये आयोजित महोत्सवात ‘मराठी चित्रपटांची वाटचाल’ या विषयावर परिसंवादाचे आयोजित करण्यात आला होता.
परिसंवादात अभिनेते जितेंद्र जोशी, दिग्दर्शक निखिल महाजन, लेखक किरण यज्ञोपवित, चित्रपट अभ्यासक डॉ. अभिजीत देशपांडे यांनी सहभाग घेतला. मराठी प्रेक्षक बर्यापैकी दुटप्पी असतात. काही अपरिहार्य कारणाने घरात मराठी व बाहेर ग्लोबल होउ पाहतात, म्हणून थिएटरच्या गर्दीवर मराठी चित्रपटाचे मूल्यमापन करु नये. अनेक चांगल्या चित्रपटांचे ब्रँडिंगदेखील होत नाही. एकूणच समीक्षा संस्कृतीत चित्रपटविषयक अनेक बीजे दडली असतात. तसेच विषय उत्तम पण सिनेमॅटिक भाषा क्षीण असली तर चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचत नाही, असा सूर या परिसंवाद कार्यक्रमातून उमटला.