शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ८ जून २०२० ला दिशा सालियनचा मृत्यू झाला होता. ती सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर होती. तिचा संशयास्पद मृत्यू झाला तेव्हा आदित्य ठाकरे मंत्री होते आणि त्यांचे वडील मुख्यमंत्री होते. दिशाच्या मृत्यूमागे आदित्यची काहीतरी भूमिका आहे असं समोर आलं होते. ८ जूनला रात्री दिशाचा मृत्यू झाला तेव्हा त्या पार्टीत हे सगळे तिकडे उपस्थित होते. मात्र हे प्रकरण तेव्हाच्या सरकारने दडपलं. मालवणी पोलिसांनी निष्पक्ष तपास केला नाही असं सांगत lसंजय निरूपम यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत.
संजय निरूपम म्हणाले की, राज्य सरकारची एसआयटी या प्रकरणाचा तपास करत आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी जो प्रश्न उपस्थित केला ते गंभीर आहे. दिशावर सामुहिक अत्याचार करण्यात आले. मुलीच्या मृत्यूनंतर ३ दिवसांनी पोस्टमोर्टम करण्यात आले. दिशाचा मृतदेह जिथं सापडला, ती जागा इमारतीपासून २५ फूट लांब आहे. तिच्या शरीरावर कुठल्याही जखमा नव्हत्या. ती नग्नावस्थेत होती असं प्रत्यक्षदर्शी सांगतात. या प्रकरणात खूप मोठे लोक सहभागी होते तरीही याकडे फार लक्ष देण्यात आले नाही. त्यानंतर सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला. सुशांतचे प्रकरण वेगळे आहे. आदित्य ठाकरेंवर सुप्रीम कोर्टात अर्ज देत माझी चौकशी झाली आहे. सीबीआयने मला क्लीनचिट दिली आहे असं सांगितले. परंतु दिशा सालियन मृत्यूची चौकशी सीबीआय करत नव्हती. दिशा प्रकरण मुंबई पोलिसांकडे आहे. त्यामुळे कोर्टाला खोटी माहिती आदित्य ठाकरेंनी दिली असा आरोप त्यांनी केला.