कानिफनाथ यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना बंदी! काय आहे कारण?

अहिल्यानगर जिल्ह्यातील मढी गावच्या ग्राम पंचायतीने तब्बल ७०० वर्षांची परंपरा असणाऱ्या श्री क्षेत्र कानिफनाथ देवस्थान यात्रेत धर्मांध मुस्लिम व्यापाऱ्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला आहे. पण या निर्णयानंतर ग्रामपंचायतीने केलेला ठराव असंवैधानिक असल्याचा आरोप मुस्लिम समाजाने केला. तर दुसरीकडे महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून या निर्णयाचे स्वागत करत निर्णय घेणाऱ्या मढी ग्रामस्थांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

कानिफनाथ यात्रेला मोठी परंपरा आहे. महिनाभर चालणारी ही यात्रा मढी ग्रामस्थांसाठी दुखवट्याचा काळ असतो. होळी पासून गुढीपाडव्यापर्यंत ही यात्रा सुरू असते. यंदा 13 मार्च पासून 30 मार्चपर्यंत ही यात्रा चालणार आहे. या काळात ग्रामस्थ तेलकट पदार्थ तळणे, लग्न कार्य, शेतीकामे, प्रवास अशा प्रकारची कामे पूर्णपणे बंद करतात. शिवाय घरातील पलंग, खाटेवर बसणे टाळतात. परंतु, यात्रेला येणारे मुस्लीम व्यापारी या प्रथा पाळत नाहीत, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. कुंभमेळ्यामध्ये जसं मुस्लीम व्यापाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे, तशाच प्रकारे आम्ही मढी कानिफनाथांच्या यात्रेत मुस्लीम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचं सरपंच मरकड यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट म्हणाले की, मुस्लिम व्यापारी स्टॅम्प पेपरवर लिहून देणार आहेत का, की या देवाला आम्ही मानतो, प्रसाद खातो, हिंदू परंपरांना मानतो. असे असल्यास त्याचा विचार केला जाईल अन्यथा मढी ग्रामपंचायतीचा निर्णय स्वागतार्ह आहे. मढी ग्रामपंचायतीच्या निर्णयाचा आदर्श देशभरातील देवस्थानांनी घ्यावा, असं आवाहनही सुनील घनवट यांनी केले. मढी गावातील ठरावाच भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी समर्थन केलं आहे. तर दुसरीकडे मढी गावात मुस्लिमांची 60 ते 70 घरं आहेत. मंदिर परिसरात 9 ते 10 दुकानं मुस्लीम समाजातील लोकांची आहेत. या लोकांनी या निर्णयाला विरोध केलाय.
गटविकास अधिकार्‍यांनी या निर्णयाविरोधात, साहाय्यक गटविकास अधिकारी संगिता पालवे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. आता यासंदर्भात प्रशासन काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here