तिरुमलाच्या श्री व्यंकटेश्वर मंदिरात एआय, भक्तांना असा होणार फायदा…

तिरुमला येथील श्री वेंकटेश्वर मंदिरातही आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा अनुभव पाहायला मिळू शकतो. मंदिर प्रशासनाने भक्तांसाठी ऑटोमेशन आणि एआय चॅटबॉट्स सादर करण्याचा विचार सुरू केला आहे. यामुळे यात्रेकरूंच्या सेवांमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल.

एजन्सीच्या म्हणण्यानुसार, टीटीडी (तिरुमाला तिरुपती देवस्थानम) कार्यकारी अधिकारी (ईओ) जे श्यामला राव यांनी ही माहिती दिली. श्यामला राव म्हणाले की, सध्या भक्तांना निवास, दर्शन आणि इतर सेवांसाठी मॅन्युअल प्रक्रियेचे पालन करावे लागते, ज्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे भक्तांना तत्काळ आणि चांगली सेवा मिळावी यासाठी मंदिर प्रशासनाने या सेवा AI च्या माध्यमातून स्वयंचलित करण्याचे नियोजन केले आहे. ऑटोमेशनमुळे मंदिरात येणाऱ्या यात्रेकरूंना चांगला अनुभव मिळेल आणि सेवेतील पारदर्शकताही वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यात्रेकरूंच्या मदतीसाठी एआय चॅटबॉटचा वापर केला जाईल, असेही राव म्हणाले. हा चॅटबॉट यात्रेकरूंच्या प्रश्नांची तत्काळ उत्तरे देईल आणि त्यांच्या समस्या सोडवेल. यामुळे भाविकांना त्यांच्या समस्यांसाठी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात कोणतीही अडचण येणार नाही आणि त्यांना आवश्यक ती माहिती सहज मिळेल. भावी पिढ्यांसाठी तिरुमलाचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक पावित्र्य जपत ‘तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून’ यात्रेकरूंचा अनुभव वाढवणे हे TTD चे उद्दिष्ट आहे.

श्यामला राव यांनी असेही सांगितले की मंदिर प्रशासन मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या ‘पारंपारिक सौंदर्य आणि आधुनिक कार्याचा’ मिलाफ करण्याच्या दृष्टीकोनाखाली तिरुमलाच्या विकासासाठी काम करत आहे.

‘व्हिजन 2047’ अंतर्गत TTD चे उद्दिष्ट जगातील सर्वात श्रीमंत हिंदू मंदिर हे जगातील सर्वात आदर्श तीर्थक्षेत्र बनवणे आहे. यासाठी मंदिर प्रशासन पर्यावरण व्यवस्थापन, विकास आणि वारसा संवर्धनावर विशेष लक्ष देणार आहे. हे पाऊल तिरुमलाला एक आदर्श तीर्थक्षेत्र बनवण्यात मदत करेल, जिथे यात्रेकरूंना चांगली सेवा मिळेल आणि मंदिराचे पावित्र्यही राखले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here