उपमुख्यमंत्री अजित पवार कधी काय बोलतील सांगता येत नाही. आता एका कार्यक्रमात अजित दादा चांगलेच संतापले. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांलयाच्या इमारतीचे भूमिपूजन, महापालिकेच्या विविध कार्यक्रमांचे भूमिपूजन, उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालं. चिखली, जाधववाडी येथे झालेल्या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गृह राज्यमंत्री योगेश कदम, महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ यावेळी उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध मान्यवरांचा सन्मान केला जात होता. त्यावेळी उपस्थित असलेले तरुण शिट्ट्या वाजवत होते. त्यामुळे अजित पवार संतापले. त्यांनी माइकचा ताबा घेतला. हा कार्यक्रम पोलिसांचा आहे. काय चालले आहे. शिट्ट्या कशाला वाजवता, शिट्ट्या वाजऊ नका, मुख्यमंत्री येथे आले आहेत. शिस्त आहे की नाही? आता शिट्ट्या वाजविल्या तर पोलिसांना उचलायला सांगेन असा इशारा अजित पवार यांनी दिला. त्यानंतर शिट्ट्या बंद झाल्या.