राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू विधानसभेत नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे. आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी या चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी शेरोशायरी करत विरोधकांना टोला लगावला. तसेच खुमासदार शैलीत विरोधकांना उत्तर दिले.
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर देत महाविकास आघाडीत येण्याचा सल्ला दिला होता. या विधानाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार त्यांचे नाव न घेता म्हणाले, “आम्ही हा अर्थसंकल्प केवळ चालू वर्षाचा विचार करून तयार केलेला नाही. तर पुढील पाच वर्षांचा विचार करून तयार केला आहे. या पाच वर्षांत कुणी गमतीने जरी म्हटले की, अमक्या-तमक्याने मुख्यमंत्री व्हा आणि पाठिंबा देतो. तरी ते काही शक्य नाही. कारण तुमच्याकडे आमदारच नाहीत तर तुम्ही पाठिंबा कसला देणार? १० ते २० टाळकी असताना हे आम्हाला पाठिंबा देणार का?”
अजित पवारांनी आमदारांना टाळकी हा शब्द वापरल्यानंतर शिवसेनेचे (ठाकरे) आमदार भास्कर जाधव यांनी आक्षेप घेत टाळकी म्हणू नका, असे म्हटले. त्यावरही अजित पवार म्हणाले की, मी आमदारांना नेहमीच सन्माननीय सदस्य म्हणत असतो. पण विरोधक ज्या पद्धतीने बोलत आहेत, त्यावर ही प्रतिक्रिया होती. पण मी एक एक सांगतो, पाच वर्षांत ब्रह्मदेव आला तरी या सरकारला कुणी धक्का लावू शकत नाही.