अजित पवारांनी राजीनामा द्यावा, वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी मनसेची मागणी

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांसहीत त्यांच्या पक्षावर टीकेची झोड उठलेली आहे. दरम्यान, अजित पवारांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) यांच्या सुनेनं आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या प्रकरणात वेगवेगळे खुलासे समोर येत आहे. हुंड्यासाठी हगवणे कुटुंबाने वैष्णवीचा छळ केल्याने तिने आत्महत्या केल्याचा आरोप केला जात असून या प्रकरणामध्ये हगवणे कुटुंबातील तीन सदस्य पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर अजित पवारांच्या पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे हे फरार आहेत. या प्रकरणावरुन राजकारण तापलेलं असतानाच राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं थेट अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

वैष्णवीच्या आहत्महत्येनंतर हगवणे यांचे पुत्र शशांक आणि तिच्या लग्नातले व्हिडीओ आता समोर आले असून ते चर्चेचा विषय ठरत आहे. या लग्न सोहळ्याला स्वत: अजित पवार उपस्थित होते. मुलीच्या घरच्यांनी दिलेल्या फॉर्च्युनरची चावी अजित पवारांनीच शशांकच्या हातात दिल्याचे फोटोही समोर आले. यावरुनच आता अजित पवारांवर मनसेनं निशाणा साधला आहे.

मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरेंनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन पोस्ट करताना अजित पवारांवर टीका केली आहे.”उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार आपण आपल्या हाताने हुंड्याच्या गाडीची चावी हगवणे कुटुंबाला देताना, आपण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहात हे विसरला होतात का?” असा सवाल शालिनी ठाकरेंनी अजित पवारांना विचारला आहे. तसेच पुढे बोलताना, “राज्यात अनेक लेकी हुंडाबळी जात असताना आपल्यावर हुंड्याविरोधात कडक कारवाईची जबाबदारी असताना, आपणच हुंडा देण्याला खतपाणी घालताना दिसताय… हे उपमुख्यमंत्री पदाला काळिमा फासणारं आहे,” अशी टीका शालिनी ठाकरेंनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here