महाराष्ट्रात आता पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्यात आल्याचा शासन निर्णयावर चांगलाच वादंग निर्माण झाला आहे. राज ठाकरे यांनीही या वादात उडी घेतली असून हे खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर भाष्य केलं आहे. ज्यांना काही उद्योग नाही, काम नाही ते असले वाद घालतात आणि त्यातच वेळ घालवतात असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.
“महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आलंच पाहिजे. भारतातील अनेक राज्यांमध्ये हिंदी भाषा वापरतात. काहीजण हिंदी राष्ट्रभाषा असल्याचं म्हणतात. पण त्यावरुन वाद असून, मला त्या वादात पडायचं नाही. ज्यांना काही उद्योग नाही, काम नाही ते असले वाद घालतात. आणि त्यातच वेळ घालवतात,” असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान अजित पवारांच्या या विधानावर मनसेचे शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी अजित पवारांना जर हिंदी राष्ट्रभाषा वाटत असेल तर त्यांनी पहिलीपासून धडे घेतले पाहिजेत. त्यांना पुन्हा शाळेत पाठवलं पाहिजे असा टोला लगावला.