नागालँडमधील विरोधी पक्षाचं बळ अचानकपणे कमी झाले आहे. अजित पवारांच्या राष्ट्रावादीचे सात आमदार मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. यामुळे सत्ताधारी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचं सरकार अजून मजबूत झालं आहे. विधानसभा अध्यक्ष शेरिंगेन लॉन्गखुमर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, सर्व सात आमदारांनी स्वतः हजर राहून एनडीपीपीमध्ये विलीन होण्याचा निर्णय सांगणारी औपचारिक पत्रे सादर केली.
दोन वर्षांपूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतला होता. पक्षात फूट पडल्यावर अजित पवार व प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीला राष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याचा निर्धार केला होता. मात्र आता तो पूर्ण होण्यात नागालँडमधील राजकीय घडामोडींमुळे सुरुंग लागला आहे.
महाराष्ट्रापाठोपाठ नागालँडमध्ये अजित पवारांच्या पक्षाच्या आमदारांचे संख्याबळ चांगले होते. एकत्रित राष्ट्रवादीतून निवडून आलेल्या सातही आमदारांनी पक्षातील फुटीनंतर अजित पवारांना साथ दिली होती.पण सातही आमदारांनी दोन दिवसांपूर्वी सत्ताधारी ‘एनडीपीपी’ पक्षात प्रवेश केला. यामुळे त्या राज्यातील पक्षाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. या सात आमदारांनी पक्षांतर केल्याने राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळवण्यासाठी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी मागील २ वर्षांपासून केलेले प्रयत्न व्यर्थ ठरले आहेत.