राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचं महायुतीच सरकार आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे कामकाज पाहत आहेत. असे असताना आता एकनाथ शिंदे ‘पॉवरफुल’ उपमुख्यमंत्री झाले आहेत. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच बळ दिले आहे.

नव्या व्यवस्थेनुसार, सर्व सरकारी फायली अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे जाण्याआधी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार आहेत. याआधी फडणवीस उपमुख्यमंत्री होते, त्यावेळी प्रत्येक फाईल आधी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असल्यामुळे अजित पवारांकडे जायची. अजित पवारांच्या मंजुरीनंतर फाईल उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जायची. फडणवीस यांनी मंजुरी दिल्यानंतर फाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी जात होती.
दरम्यान, आता प्रत्येक फाईल आधी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असल्यामुळे अजित पवारांकडे जाईल. नंतर फाईल उपमुख्यमंत्री आणि नगरविकासमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्याकडे जाईल. शिंदेंच्या नंतर प्रत्येक फाईल अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार आहे. फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळी शिंदे नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. कारण प्रत्येक फाईल अजित पवारांकडे जायची आणि तिथून थेट मुख्यमंत्र्यांकडे म्हणजेच फडणवीसांकडे पाठवली जात होती. फक्त शिंदेंच्या खात्याशी संबंधित फायलीच अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अशी त्रिस्थळी यात्रा करत होत्या. पण, आता या सर्व फायली अजित पवार यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार आहेत. त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठवल्या जाणार आहेत.