अनेक लोकांना तोंड येत म्हणजे तोंडात अल्सर येतात. तोंडात अल्सर येण्यामागे अनेक वेगवेगळी कारणं असतात. मसालेदार पदार्थांचं अतीसेवन, अपुरी झोप, गरम चहा कॉफी किंवा जीवनसत्वांची कमतरता हे साधारणं कारणं असतात. त्यामुळे तोंड आल्यास किंवा अल्सर झाल्यास त्याच्याकडे साधारण आपण दुर्लक्ष करतो. पण वरच्या वर आणि गंभीर स्वरुपात अल्सर येत असेल तर याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकतं. तोंडात अल्सर हे कॅन्सरच लक्षण असण्याची दाट शक्यता असल्याचे डॉक्टर सांगतात. कॅन्सर हा धोकादायक आणि जीवघेण्या आजार आहे. कॅन्सरचे लक्षणं हे लगेचच लक्षात येत नाही. त्यामुळे अल्सर आल्यास त्याकडे दुर्लक्ष करु नका.
भारत हा जगातील अशा देशांमध्ये समाविष्ट आहे जिथे तोंडाच्या कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण आढळतात. याचं एक प्रमुख कारण म्हणजे तंबाखू आणि गुटख्याचे सेवन, पण हा धोका आता धूम्रपान न करणाऱ्यांमध्येही वाढत असल्याच समोर आलं आहे. विशेषतः ज्यांना वारंवार तोंडात अल्सर असतात किंवा ज्यांच्या जखमा बराच काळ बऱ्या होत नाहीत. तज्ज्ञांच्या मते, जर फोड दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ बरा झाला नाही, वेदना आणि रक्तस्त्राव होत असेल किंवा पांढरा किंवा लाल ठिपका बनला असेल तर हे कर्करोगाचे लक्षण असू शकतं.
जर तोंडाचा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात आढळला तर तो उपचार करण्यायोग्य आहे. म्हणून, वेळेवर तपास आणि दक्षता खूप महत्वाची आहे. जर तुम्ही तंबाखू, गुटखा किंवा सुपारीचे सेवन करत असाल तर नियमित दंत तपासणी करणे ही तुमची प्राथमिकता असली पाहिजे. डॉक्टरांच्या मते, सुपारी, अल्कोहोल, तोंडाची अस्वच्छता आणि एचपीव्ही विषाणूमुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. आरोग्य मंत्रालय आणि दंत तज्ञ सल्ला देतात की जर तोंडात वारंवार अल्सर येत असतील किंवा कोणतेही असामान्य बदल दिसून येत असतील तर ताबडतोब तज्ज्ञांशी संपर्क साधा.