विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. मुंबई पोलीस हे बेटिंगला सहकार्य करत आहेत. त्याचे पुरावे पेन ड्राईव्हमध्ये आहेत असं म्हणत अंबादास दानवे यांनी एक पेन ड्राइव्ह अध्यक्षांना दिला आहे. तसंच मुंबई पोलिसांच्या उपस्थितीत पाकिस्तानी खेळाडूंशी संपर्क केला जातो आहे. बेटिंगमध्ये अनेक पोलीस अधिकारी आहेत असा गंभीर आरोप दानवे यांनी केला आहे.
माझ्याकडे अनेक फसवणुकीच्या घटना आहेत, खालच्या सभागृहात बेटिंग अॅपबाबतही बोलणं झालं आहे. मी एक पेन ड्राइव्ह आपल्याला देत आहे. क्रिकेट बेटिंग अॅप आहे लोटस २४ नावाचं. यामध्ये मेहुल जैन, हिरेश जैन, कमलेश जैन हे लोक सातत्याने बेटिंग करतात. पाकिस्तानातील खेळाडूंशी हे संपर्क ठेवून आहेत. खुलेआमपणे बेटिंग चालतं. मुंबई पोलिसांमधल्या मोठ्या अधिकाऱ्यांसह बैठक होते. चॅम्पियन्स ट्रॉफी संपली आता आयपीएलसाठी मुंबईत ही मंडळी काम करत आहेत. पेन ड्राइव्ह ऐका म्हणजे पाकिस्तानातल्या लोकांशी बोलताना काय केलं आहे ते कळेल. कुठल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावं आहेत ते पण कळेल. अशा पद्धतीने पोलिसांच्या सहकार्याने राज्यात बेटिंगसारख्या घटना घडत आहेत. असा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.