ऑपरेशन सिंदूरनंतर देशभरात सुरू असणारा जल्लोष पाहता अमित ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच एक पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी शस्त्रसंधीसारख्या महत्त्वाच्या आणि तितक्याच संवेदनशील पावलानंतर देशात सुरू असणाऱ्या आनंदोत्सवावर कटाक्ष टाकत मनातील खंत व्यक्त केली. केंद्रानं सध्या घेतलेली भूमिका स्तुत्य असल्याचं म्हणत सध्याच्या संवेदनशील दिवसांचा संदर्भ त्यांनी देत या पार्श्वभूमीवर, सध्या काही ठिकाणी विजयाचं प्रतीक म्हणून राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांबाबत सामान्यांच्या मनात भावनिक संभ्रम असल्याचं स्पष्ट केलं.
या पत्रात ते म्हणाले, ही परिस्थिती विजयाची नसून ‘ceasefire’ (युद्धविराम) आहे. आणि म्हणूनच, ज्या घटनेत आपल्या शूर जवानांनी प्राणत्याग केला, त्याच काळात साजरे होणारे उत्सव अनेकांच्या मनाला वेदना देणारे आहेत.
या काळात जर काही अभिव्यक्त करायचं असेल, तर ते आपल्या सैनिकांचं बलिदान, त्यांच्या शौर्यगाथा आणि त्यांच्या कुटुंबांचं अद्वितीय धैर्य असावं. परंतु सध्या काही ठिकाणी जी आनंददर्शक आंदोलने किंवा ‘विजय यात्रा’ (मुख्यत्वे राजकीय स्वरूपातील) या समर्पक वाटत नाहीत. वास्तविक, या क्षणी देशवासीयांच्या मनात एकच भावना आहे, शहिद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी दीर्घकालीन कल्याणकारी उपायांची गरज आहे, आणि या बलिदानाच्या पार्श्वभूमीवर समाज म्हणून आपण अधिक संवेदनशील राहण्याची आवश्यकता आहे’, असा आग्रही सूर त्यांनी आळवला.
सद्यस्थितीचा विचार करता देशात काही गंभीर बाबींविषयी अद्यापही अनिश्चितता असल्याचं म्हणत पहलगाम हल्ला करणाऱ्या त्या निर्दयी अतिरेक्यांविरुद्ध ठोस आणि निर्णायक कारवाई होणे हीच खरी जनभावना आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. ‘याशिवाय, भारत-पाकिस्तान सीमारेषेवर गेल्या काही दिवसांत आपल्या काही नागरिकांनी आणि जवानांनी आपले अमूल्य प्राण गमावले आहेत. अशा पार्श्वभूमीवर विजयाचा उत्सव साजरा करण्यापेक्षा, समाजात या संदर्भातील साक्षरता, सजगता आणि संवेदनशीलता निर्माण करणं हे अधिक योग्य ठरेल.
तसेच, जरी सध्या युद्धविराम जाहीर झाला असला, तरी पाकिस्तानच्या गतइतिहासाचा विचार करता त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणे कठीण आहे. त्यांनी यापूर्वीही अनेकवेळा अशाच संधींमध्ये दगाफटका केलेला आहे. त्यामुळे अशा स्थितीत समाजातील नागरिकांना सजग ठेवणे, युद्धजन्य परिस्थितीत त्यांना काय करावे याचे मार्गदर्शन करणे, आणि त्यांची मानसिक तयारी घडवून आणणे हेही सरकारच्या धोरणाचा महत्त्वाचा भाग ठरायला हवा’, ही बाबसुद्धा त्यांनी या पत्राच्या माध्यमातून पंतप्रधानांच्या लक्षात आणून दिली.