बजरंग दलाने औरंगजेबाची कबर उखडून टाकू असा इशारा दिला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अनिल देशमुख यांनी भाष्य केलं आहे. देशमुख म्हणाले, “बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांचं हे वक्तव्य अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे.”
अनिल देशमुख यांनी काही वेळापूर्वी पीटीआयशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “बजरंग दलाच्या काही पदाधिकाऱ्यांनी काल पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची कबर आहे, ती सरकारने हटवली नाही तर आम्ही कारसेवा करून ती हटवू. त्यांचं हे वक्तव्य खूपच दुर्दैवी आहे.”
देशमुख म्हणाले, “बाबरी मशिदीची जखम अजून ताजी असताना कोणीही अशा प्रकारचं वक्तव्य करणं योग्य नाही. महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम एकोप्याने राहत आहेत. मात्र, अशा प्रकारची वक्तव्ये करून सामाजिक वातावरण खराब करण्याचं काम बजरंग दलाकडून केलं जात आहे. सरकारने त्यांच्यावर कडक कारवाई करायला हवी.”